जय जय जगदंबे श्री अंबे। रेणुके कल्पकदंबे ।। धृ ।
अनुपम स्वरुपाची । तुझी धाटी ।
अन्य नसे या सृष्टी । तुझ सम रूप दुसरे ।
परमेष्टी ॥
करिती झाला कष्टी । शशी रसरसला । वदनपुटी ।
दिव्य सुलोचन दृष्टी । सुवर्ण रत्नांच्या ॥
शिरी मुकुटी । लोपती रविशशी कोटी । गजमुखी तुज स्तविले ।
हे रंभे मंगल सकलारंभे ॥ जय जय ॥ १ ॥
कुमकुम शिरी शोभे । मळवटी ।
कस्तुरी तिलक ललाटी । नासिक अति सरळ । हनुवटी ।।
रुचीरामृत रस ओठी । समान जणू लवल्या । धनकोटी । आकर्ण लोचन भ्रुकुटी । शिरी नीट भांगवळी । उफराटी॥
कर्नाटकाची घाटी । भुजंग निळरंगा । परी शोभे ।
वेणी पाठी वरी शोभे ॥ जय जय ॥ २ ॥
कंकणं कनकाची । मनगटी ।
दिव्य मुद्रा दश बोटी बाजूबंद नगे । बाहुबटी ॥
चर्चुनी केशर उटी । सुगंधी पुष्पांचे हार कंठी । बहु मोत्यांची दाटी ।
अंगी नवीचोळी । जरीकाठी ॥
पीत पितांबर तगटी । पैंजणं पदकमली ।
अति शोभे ।
भ्रमर धावती लोभे ।। जय जय ॥३ ॥
साक्षेप तू क्षितिजा । तळवटी ।
तूच स्वये जगजेठी । ओवाळीन आरती दीपताटी॥
घेउनी कर संपुष्टी । करुणामृतहृदये । संकटी ।
धाविसी भक्तांसाठी विष्णू सदा । बहु कष्टी ॥
देशील जरी निजभेटी । तरी मग काय उणे ।
या लाभे ।
धाव पाव अविलंबे ॥जय जय ॥ ४ ॥