DevDharm —

*समर्थ रामदासांची करूणाष्टके*


*बुद्धि दे रघुनायका*


युक्ति नाही बुद्धि नाही । विद्या नाही विवेकिता ।
नेणता भक्त मी तुझा । बुद्धि दे रघुनायका ॥१॥
मन हे आवरेना की । वासना वावडे सदा ।
कल्पना धावते सैरा । बुद्धि दे रघुनायका ॥२॥
अन्न नाही वस्त्र नाही । सौख्य नाही जनांमध्ये ।
आश्रयो पाहतां नाही । बुद्धि दे रघुनायका ॥३॥
बोलतां चालतां येना । कार्यभाग कळेचिना ।
बहू मी पीडलो लोकीं । बुद्धि दे रघुनायका ॥४॥
तुझा मी टोणपा जालो । कष्टलों बहुतांपरी ।
सौख्य ते पाहतां नाही । बुद्धि दे रघुनायका ॥५॥
नेटकें लिहीतां येना । वाचितां चुकतो सदा ।
अर्थ तो सांगता येना । बुद्धि दे रघुनायका ॥६॥
प्रसंग वेळ तर्केना । सुचेना दीर्घ सूचना ।
मैत्रिकी राखितां येना । बुद्धि दे रघुनायका ॥७॥
कळेना स्फूर्ति होईना । आपदा लागली बहू ।
प्रत्यही पोट सोडीना । बुद्धि दे रघुनायका ॥८॥
संसार नेटका नाहीं । उद्वेगो वाटतो जिवीं ।
परमार्थू कळेना की । बुद्धि दे रघुनायका ॥९॥
देईना पुरविना कोणी । उगेचि जन हांसती ।
विसरु पडेना पोटी । बुद्धि दे रघुनायका ॥१०॥
पिशुने वाटती सर्वे । कोणीही मजला नसे ।
समर्था तू दयासिंधू । बुद्धि दे रघुनायका ॥११॥
उदास वाटते जीवी । आता जावे कुणीकडे ।
तू भक्तवत्सला रामा । बुद्धि दे रघुनायका ॥१२॥
काया वाचा मनोभावे । तुझा मी म्हणवीतसे ।
हे लाज तुजला माझी । बुद्धि दे रघुनायका ॥१३॥
सोडविल्या देव कोटी । भूभार फेडिला बळे ।
भक्तांसि आश्रयो मोठा । बुद्धि दे रघुनायका ॥१४॥
भक्त उदंड तुम्हाला । आम्हाला कोण पूसते ।
ब्रीद हे राखणे आधी । बुद्धि दे रघुनायका ॥१५॥
आशा हे लागली मोठी । दयाळू बा दया करी ।
आणखी नलगे काही । बुद्धि दे रघुनायका ॥१६॥
उदंड ऐकिली कीर्ति । पतितपावना प्रभो ।
मी एक रंक दुर्बुद्धी । बुद्धि दे रघुनायका ॥१७॥
रामदास म्हणे माझा । संसार तुज लागला ।
संशयो लागतो पोटी । बुद्धि दे रघुनायका ॥१८॥


*धर्मज्ञानगंगा समूह*