चैत्र शु.३ सोमवार
८ एप्रील २०१९

सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन भगवान श्री परशुरामांचे चरीत्र पुढे पाहु.
परवा आपण सहस्त्रार्जुन व रावण यांचे युध्द व वासिष्ठांचा शाप व जामदग्नींच्या आश्रमाचा विध्वंस पाहिला आज पुढे. स्वर्गलोकात कामधेनु, सुरभी, नंदिनी अशा दिव्य "गोमाता " वास्तव्य करतात.त्यांची सेवा करुन अनेक ऋषिमुनी व राजांनी वर प्राप्त केले आहेत.
आपल्या मंगल मनोकामना पूर्ण करणार्या अशा दिव्य गोमातांना कामधेनु असे म्हणतात.

शतपथ ब्राह्मणात गो मातेची उत्पत्ती कथा आलीय
दक्ष प्रजापतीने प्राणिसृष्टि निर्माण केल्यावर थोडे अमृत प्राशन केले त्यामुऴे तो संतुष्ट झाला व त्याचा नाकातुन एक श्वास बाहेर पडला त्याचा सुगंध सर्वत्र दरवऴला त्यातुन एक गाय जन्माला आली ती सुगंधातुन जन्मली म्हणुन "सुरभी " असे नाव ठेवले हि सर्व गोवंशाची माता ठरली.
ऋग्वेदात "अघ्न्या "म्हणजे अवध्य असा गायीचा उल्लेख अनेकदा आढऴतो.
तैत्तरीय ब्राह्मणात "यज्ञो वै गौ:"。म्हणजे यज्ञ म्हणजे गाय(3.9.8.3) ( याचा एक अर्थ यज्ञाकरता लागणारे घृत, दुग्ध, दहि, गोमुत्र, गोमय हे सर्व पदार्थ व यज्ञाचे इंधन म्हणुन गोवरी वगैरे तसच यज्ञाची दक्षिणा हि गोप्रदानाने होत असते यास्तव गोमाता हि यज्ञाचे स्वरुप आहे)
"अन्नं वै गौ:。"(3.9.8.3) म्हणजे अन्न म्हणजे गाय होय दुध हे आपल्याकडे पूर्णान्न मानले आहे त्यामुऴे गोमातेचे दुध हे देखील अन्नच आहे (आपल्याकडे पयोव्रतासारखी व्रते देखील आहेत ज्यात केवऴ दुग्धपान करुन राहयचे आहे) दहि, ताक, तूप हे आपल्या भोजनात नित्य असतेच म्हणजेच गोमाता हि "अन्न स्वरुपात "आहे
महाभारतात तर भिष्मांनी धर्मराजाला उपदेश केलाय
मातर:सर्वभूतानां गाव:सर्वसुखप्रदा:।
बुध्दिमाकाङ्क्षता नित्यं गाव:कार्या प्रदक्षिणा:।।
सन्त्याड्यं न तु पादेन गवां मध्ये न च व्रजेत्।
मङ्गलायतनं देव्यस्तस्मात्पूज्या: सदैव हि ।।
(अनु.7.8)
गायी या सर्व भूतांच्या माता आहेत त्या सर्वसुखप्रदान करणार्या आहेत.ज्यांना आपल्या सुखाची अभिवृध्दिची कामना असेल त्यांनी गायींची सेवा करावी प्रदक्षिणा कराव्यात त्यांना लाथ मारु नये किंवा कऴपात घुसुन त्रास देवु नये गायी या मंगलांचे स्थान आहेत त्यामूऴे त्या सदैव पूज्य आहेत.
भिष्मांसारखा आचारसंपन्न अपराजीत योध्दा जेव्हा धर्मराजाला (युवराजाला) हा उपदेश करतोय त्याचा अर्थ राजाचे कर्तव्य गोपालन हेच आहे हा होतो व पुढे हे तू पूर्ण करावेस असा होतो.
अनेक राजांनी गोपालनाचे महत्व जाणले होते दिलीप राजाने नंदिनी गायीचा केलेला सांभाऴ व पुढे त्याचे मिऴालेले मधुर फळ आपण जाणताच (एखाद्या प्राण्याची उपयुक्तता संपल्यानंतर तो फुकट का पाऴावा का पोसावा? हा प्रश्न विचारणार्यांनी स्वत: वृध्द झाल्यावर आपल्या मुलांनी आपल्याशी अस वागल तर आपणास चालेल का? हा विचार करावा किंवा वृध्दापकाऴी यांचा उपयोग नाहि त्यामुऴे त्यांचे अवयव का विकु नयेत? हा विचार मनाशी आणावा.
मी अनेक शेतकरी बांधव पाहिलेत जे आपल्या पोटच्या पोरांप्रमाणे गायीगुरांना जीव लावतात त्यांचाशी बोलतात, खेऴतात, त्यांना आपली सुखदु:खे सांगतात, सणावाराला गोडधोड नैवेद्य करतात, सजवतात त्यांना लेकराप्रमाणे जपतात ते असे हेतुपुरस्सर करणे शक्य वाटत नाहि.नाईलाजाने हि वेळ त्यांचावर येता नये या करता आपण समाजाने हातभार लावणे आज आवश्यक आहे.
ऋग्वेदात अशा वृध्द गो, बैलांकरता विशेष कुरणाची योजना राजाने करावी व त्यांची देखभाल योग्य करावी असे संदर्भ आले आहेत.स्मृतिकारांनी राजाचे हे कर्तव्य दिले आहे तेव्हा आपण सर्वांनी आपल्या उत्पन्नातला एखादा अंश या गायी गुरांकरता दिला.किंवा दुष्काऴग्रस्त भागातल्या गुरांच्या छावणीतल्या चारा पाण्याकरता उपलब्ध केला तर या शेतकरी व गोपालकांना आपला अेक अल्प हातभार लागेल व त्यांना हे गोधन खाटिकांना विकण्याची मनात इच्छा होणार नाहि व आपणहि ज्या गायी गुरांचे दुध प्यायलो, दहि, तूप ताक लोणी भक्षण केले त्यांचा बद्दल एक आपली कृतज्ञता होईल व पुण्य देखील लाभेल)
दिलीप राजाने केलेल्या नंदिनी नामक गोमातेच्या सेवेचे फऴ रघुवंशांच्या उत्कर्षात झाले.दिलीपाचा पुत्र रघु झाला रघु पासुन पुढे उत्तमोत्तम व प्रजापालक राजांची परंपरा रघुवंशात झाली हे गोसेवेचेच फऴ होते. कामधेनु हि अशीच दिव्य गोमाता जमदग्नींच्या आश्रमात होती.ससैन्य कार्तवीर्य सहस्त्रार्जुन जेव्हा भगवान श्री परशुरामांचे सामर्थ्य पाहण्याकरता जमदग्नींच्या आश्रमात आला तेव्हा राजाचे व सेनेचे उत्तमोत्तम आदरातिथ्य व सर्वांना मिष्टान्न भोजन कामधेनुच्या कृपेने जमदग्नी ऋषिंनी या सर्वांना घडवले.वनवासी गरीब जमदग्नींकडे अल्पावधीत एवढे उत्तमोत्तम अन्न कसे?हा विचार सहस्त्रार्जुनाच्या मनात आला तेव्हा जमदग्नींनी हि सर्व कामधेनुची कृपा असे सांगीतले. त्यामुऴे या गोमातेचा हेवा सहस्त्रार्जुनास घडला त्याला मोह झाला दुर्बुध्दि जागृत झाली व त्याचा परीणाम आश्रम उध्वस्त करुन सहस्त्रार्जुन बऴजबरीने कामधेनु चोरुन घेवुन गेला.
भगवान परशुराम त्या वेऴी आश्रमात नव्हते. ते आश्रमात परतले असता त्यांना सर्व वृत्तांत कऴला
#राजाचे_कर्तव्य_
गोब्राह्मण_ गुरुकुलाचे रक्षण_चोराना शासन_आहे राजा असुन देखील सहस्त्रार्जुनाने या सर्व कर्तव्यांचा भंग केला व स्वत: गोमातेची चोरी केली तेव्हा या उद्दामपणास दंड देण्याकरता भगवान परशुरामांनी सहस्त्रार्जुनाचा वध करेन हि प्रतिज्ञा केली.
जमदग्नी मात्र शांत होते त्यांनी भगवंतांना समजवले कि आपल्यापेक्षा राजाला या गोमातेची आवश्यकता जास्त असेल त्यामुऴे तुम्हि क्रोध आवरा.
भगवान श्री परशुरामांनी पित्यास सांगीतले जेव्हा राजा दुराचारी बनतो तेव्हा ब्राह्मणाचे परम कर्तव्य त्याला दंड देणे हेच आहे मी याच शास्त्रवचनास अनुसरुनच राजा भ्रष्ट झाल्याने त्याचा वध करणार आहे.
जमदग्नींनी तेव्हा भगवान परशुरामांना ब्रह्मदेवांची परवानगी या करता घ्यावी असे सांगीतले. (निदान ब्रह्मदेव यांचा राग शांत करतील असे वाटले)ब्रह्मदेवांनी यांना सांगीतले मी सृष्टिचा उत्पत्ती कर्ता आहे संहार हे कर्म भगवान शंकरांचे आहे ते तुमचे गुरु आहेत त्यांची परवानगी घ्या.
भगवान शंकरांनी परशुरामांना युध्द करण्यास आज्ञा दिली.
पुढे काय झाले सहस्त्रार्जुनाचा वध कसा झाला हे पुढिल भागात पाहु.
तुर्त लेखन मर्यादा.
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
VengurlabhushanGmail.com