दि.२५एप्रील२०१९
चैत्र कृ.६ गुरुवार

गेला आठवडाभर काहि कारणास्तव लेखमालेत खंड पडला होता त्या बद्दल क्षमस्व.

सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन भगवान श्री परशुरामांचे चरीत्र पाहु.
आठ दिवसापूर्वी आपण कार्तवीर्य सहस्त्रार्जुनाच्या पुत्रांकडुन जमदग्नींचा झालेला वध व भगवंतांची प्रतिज्ञा पाहिली आज पुढे पाहु.
भगवंतांचा प्रचंड संताप पाहुन जगन्माता पार्वतीदेवीचा अवतार असलेल्या रेणुकामातेने भगवान परशुरामांना जमदग्नींचे "योग्य स्थानी " और्ध्वदेहिक कर्म करण्याविषयी आज्ञा दिली.
भगवान श्री परशुरामांनी एक काव़ड बनवली त्यात एका परड्यात "औषधी तेलात " जमदग्नींचा देह ठेवला अंत्यकाळी करायचा इष्टि नामक यज्ञ त्याला अंत्येष्टि म्हणतात. पर्युषित देहाची (शिऴ्या देहाची आहुती) पंचमहाभूतांना देवु नये यास्तव मृत्युनंतर लगेचच अंत्यकर्म करावे अथवा विशिष्ट औषधी तेलामध्ये तो देह ठेवला तर तो खराब होत नाहि (.रामायणात देखील भरत शत्रुघ्न मामाच्या राज्यातुन परत येईपर्यंत दशरथ राजाचा देह असाच तेलात ठेवुन जतन केल्याचा उल्लेख आहे) असे असल्याने भगवान परशुरामांनी हा देह तेलाच्या कावडित ठेवला व दुसर्या पारड्यात माता रेणुका बसल्या. मजल दरमजल करत भगवान श्री परशुराम दत्तमहाराजांचे वास्तव्य असलेल्या "माहुर " येथे पोहचले .भगवान श्री परशुराम हे दत्तमहाराजांचे शिष्य असल्याने त्या ठिकाणी त्यांनी दत्तांचा धावा केला दत्तगुरु प्रकटले दत्तप्रभुंनी जमदग्नींचा छिन्नविछिन्न देह पाहिला व ते संतप्त झाले .
भगवान श्री परशुरामांनी घडलेला सर्व वृत्तांत कथन केला .
दत्तमहाराजांनी माहुर क्षेत्रीच जमदग्नींचा अंत्यसंस्कार करण्याची आज्ञा दिली.भगवान परशुरामांनी दत्तमहाराजांना या अंत्यकर्माचे पौरोहित्य करावे अशी विनवणी केली ती विनंती दत्तगुरुंनी मान्य केली व जमदग्नींचे अंत्यकर्म स्वत:मार्गदर्शन करुन भगवान श्री परशुरामांकडुन करुन घेतले.
जमदग्नींसोबत रेणुकामाता स्वेच्छेने सती गेल्या.एका तपस्वी पर्वाचा शिव पार्वतीच्या अंशावताराचा समारोप झाला भगवान परशुराम जसे क्रोधीत झालेले होते तसे मातृवियोगाने व्यथीत झाले होते .भगवंतांना मातृवियोग सहन होईना ते शोकमग्न झाले तेव्हा दत्तमहाराजांनी त्यांना जगदंबा स्वरुपी रेणुकामातेची प्रार्थना करण्याची विनंती केली भगवान परशुरामांच्या कारुण्यभावाने प्रभावीत होवुन रेणुकामाता माहुर येथे स्वयं भू रुपात प्रकट झाली.
(देवीच्या साडेतीन पीठात हे एक स्थान आहे) अन्य स्थानांवर जगदंबेच्या हातात गदा, खड्ग, चाप वगैरे शस्त्र आहेत परंतु या माहुर स्थानावर जगदंबेच्या हाती शस्त्र नाहि कारण ती या ठिकाणी मातृ वात्सल्यभावाकरता प्रकटली आहे .जेथे वात्सल्य आहे तेथे शस्त्राची आवश्यकता नसते.
देवीच्या उपासना करणार्यांना "शाक्त उपासना "असे संबोधन आहे.
देवी सगुण आहे तशी निर्गुण आहे.सत्व रज तम या गुण त्रयांना धारण करणारी त्रिगुणात्मिका आहे.ॐ कार हे मुऴ रुप आहे.मार्कंडेय महापुराणात आलेले दत्तप्रभुंनी वर्णन केलेले आदिमायेचे रुप ॐ या अक्षरा बद्दल
अकरोश्च तथोकारो मकारश्चाक्षर त्रयम् ।
तिस्त्रो मात्रा: सात्विकी च राजसी तामसीच ।।
निर्गुणा योगिगम्या च अर्धमात्रोर्ध्व संस्थिता ।
वाच्यास्तिस्त्रोर्धमात्रा तु वचसो सा न गोचरा ।।
अ कार उ कार व म कार या तिन मात्रांमध्ये सात्विक राजसी व तामसी असे गुण धारण करणारी व अर्धचंद्राकार बिंदुत जो अर्धमात्रा आहे त्यात योगमायेला धारण करणारी हि आदिशक्ति आहे महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठ आहेत ती याच ॐ कार स्वरुपात असणारी साडेतीन मात्रांचे स्वरुप आहे.
स्वयं भू रुपात प्रकटलेल्या रेणुका मातेने आपल्या पुत्राचे चुंबन घेतले व त्यांचा शोक दुर केला.
एकमेव महापराक्रमी अशा पुत्राची हि माता असल्याने "एकवीरा " हे विशेष नाम मातेस प्राप्त झाले.
वरील माहितीत काहि न्युन असेल तर क्षमस्व
वे.भूषण दिगंबर जोशी वेंंगुर्ले
VengurlabhushanGmail.com