२४ मार्च२०१९
फाल्गुन कृ.४ रविवार

विशेष सुचना- हा लेख सश्रध्द आस्तिक व परशुराम भक्तांकरता आहे नास्तिकांनी दुर्लक्ष करावे.
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन परशुराम चरीत्र मांडत आहे.
भगवान महाविष्णुंना या सृष्टिचा प्रपितामह असे भगवद्गीतेत (११.३९) संबोधले आहे . ब्रह्मदेव हे पितामह व महाविष्णु हे प्रपितामह आहेत .सृष्टिचे पालन व रक्षण हे महाविष्णुंचे कर्तव्य अाहे.ज्या ज्या वेऴी धर्मास ग्लानी येते त्या त्या वेऴी धर्माचे अभ्युत्थान घडवण्याकरता व साधु सज्जनांच्या रक्षणाकरता व दुष्टांचा संहार करण्याकरता महाविष्णु अवतार घेतात. परशुराम चरीत्र हे या वचनाचे प्रत्यक्ष प्रमाण आहे.
परशुरामांचे चरीत्र हे शास्त्रवचन पालनाचे आदर्श उदारण आहे.
भृगु कुऴात जन्म झाल्यामुऴे परशुरामांना भार्गवराम असे यांना विशेषण योजले जाते.
तपस्वी आचरण संपन्न व सात्विक मातापित्याच्या पोटिच भगवंत अवतार घेतात हे देखील सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. देवतांनी,साधुंनी, संतांनी अवतार घेतले पाहिजेत असे सर्वांना वाटते परंतु त्यांचे पालकत्व स्विकारण्याकरता भौतिक सुखांचा त्याग करुन सन्मार्गाने उपासना करण्याची तयारी मात्र नसते.अवतारांनी शेजारच्या घरी जन्म घ्यावा हि मानसीकता मात्र समाजाची असते.
भृगुकुळात एकापेक्षा एक विद्वान तपस्वी ऋषि जन्मास आले या सर्वांच्या कठोर तप:साधनेचा परीणाम म्हणजे परशुराम भृगुकुऴात जन्मले.
परशुरामांच्या पूर्वजांचा थोडा मागोवा आपण घेवुया
यो विद्याच्चतुरो वेदान् साङ्गोपनिषदो द्विज:।
न चेत् पुराणं संविद्दान्नैव स स्याद् विचक्षण:।। (वायुपुराण)
वेदांगे, उपनिषदे यांसह चारही वेदांचे अध्ययन केलेला ब्राह्मण जर पुराण वाङ्मयाविषयी अनभिज्ञ असेल तर त्याला विद्वान म्हणता येणार नाहि.
पुराणांमध्ये विविध ऋषिंच्या व राजांच्या वंशावळी त्यांची राज्ये व काऴ या विषयी विस्तृत माहिती आहे त्यामुऴे परशुरामचरीत्र पुराणांसहच अभ्यासावे लागेल.

परशुरामांच्या मातृवंशाची माहिती सर्वप्रथम पाहु.
उर्वशी व पुररव्यास एकदंर सहा पुत्र झाले त्यात "विजय " नामक पुत्र भीम, या भीमाचा पुत्र कांचन, कांचनाचा पुत्र होत्र, होत्राचा पुत्र जन्हु (याने गंगेला ओंजऴीत घेवुन प्राशन केले होते एवढा हा तपस्वी) जन्हुचा पुत्र पूरु, पूरुचा पुत्र बलाक व बलाकाचा पुत्र अजक, या अजकाचा पुत्र कुश या कुशाला चार पुत्र होते त्यातल्या कुशांबूचा पुत्र गाधी हा राजा होता. (पुररवा हा अग्निउपासक होता याने "अरणीमंथा "हे अग्नि उत्पादनकरण्याचे साधन बनवले (भागवत महापुराण.९.१४.४४)उर्वशी सह अग्निमंथन करुन "जातवेद " नामक अग्निचे निर्माण केले व त्या अग्निचे तीन वेदांनी संस्कार करुन अाहवनीय, गार्हपत्य व दक्षिणाग्नि अशी विभागणी करुन पुत्रवत त्यांचा स्विकार केला आज देखील मंथन करुन अग्नि निर्माण करताना अरणी व मंथा पूजन करताना उर्वशी व पुरुरवा या नामानेच केले जाते) सांगण्याचा हेतु हाच आहे कि शुध्दा बीजापोटि फऴे रसाऴ गोमटि हे संतवचन तंतोतंत सत्यच आहे.पुरुरव्या पासुनची परंपरा गाधी राजा पर्यंत आली या गाधीच्या कन्येचे नाम सत्यवती होते.
ऋचीक नामक ऋषींनी तिला मागणी घातली हा वर योग्य नाहि परंतु याला नकार कसा द्यायचा हा विचार करुन गाधी राजाने त्या ऋचीकाला आम्हास एक हजार घोडे शुल्क रुपात द्यावेत ज्यांचे शरीर पांढरे व एक कर्ण काऴा हवा अशी विचित्र अट घातली.
ऋचीकांनी वरुण देवतेची उपासना केली अशा प्रकारचे घोडे मिऴवले व ते नेवुन गाधी राजाकडे दिले त्यामुऴे ऋचीकांचा विवाह सत्यवतीशी झाला.
हे ऋचीक परम तपस्वी आचरण संपन्न होते यांच्या एका विशेष अनुष्ठानामुऴे च सत्यवतीला पुत्र झाला हे कोणते अनुष्ठान होते या (भागवत महापुराण स्कं९.अ.१५) विषयी उद्या पाहु
तुर्त लेखन मर्यादा

वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
Vengurlabhushan@gmail.com