रामनवमी शनिवार
१३ एप्रील २०१९

सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन भगवान श्री परशुरामांचे चरीत्र पाहु.
परवा आपण अक्षौहिणी विषयी व सहस्त्रार्जुन युध्दातला संहार जाणुन घेतला व जमदग्नी वध विषय जाणुन घेतला आज पुढे पाहु.
कार्तवीर्य सहस्त्रार्जुनाचे पाच पुत्र या युध्दात पऴुन गेल्याने वाचले जयध्वज, शूरसेन, वृषभ, मधू, ऊर्जित अशी त्यांची नावे होती. (भागवत महापुराणात नवम स्कंधात २३ अध्यायात सहस्त्रार्जुनाचा कुलवृत्तांत विस्ताराने आलाय विस्तारभयास्तव मी या ठिकाणी देत नाहिये तो मुऴातुनच पाहावा) या पाच जणांनी ध्यानमग्न जमदग्नींच्या शरीरावर २१ वार करुन निर्दयीपणे अकारण त्यांची हत्या केली.
भगवान श्री परशुराम समिधा घेवुन आश्रमात परतले असता त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला भगवंत प्रचंड संतापले त्यांनी दुष्ट , दुराचारी, उद्दाम व अनिर्बंध क्षत्रियांचा २१ वेऴा संहार करेन अशी घोर प्रतिज्ञा केली. (भगवंतांनी कोठेहि निष्पाप किंवा सन्मार्गी क्षत्रियांचा वध केला नाहि हे सर्व प्रथम लक्षात घ्यावे. जनक राजा,ऱघुवंशातले दशरथ राजा असे सर्व क्षत्रिय त्या काऴात देखील होते भगवंतांनी त्यांचा वंश कधीच संपवला नव्हता कारण ते सन्मार्गी होते .
अगदि सहस्त्रार्जुनाच्या नातवंड पतवंडाचा देखील भगवंतांनी संहार केला नव्हता.
भागवत महापुराणात सहस्त्रार्जुनाच्या पुढच्या पिढिचा वंशवेल देखील दिलाय भगवान परशुरामांनी जर वंशविच्छेद केला असता तर मग हे पुढे वाचलेच नसते याचा अर्थ भगवंतांनी केवऴ दुष्टांचाच संहार केलाय.सहस्त्रार्जुनाचा पुत्र जयध्वज जयध्वजाचा पुत्र तालजंघ
तालजंघाचे शंभर पुत्र होते त्यांचा संहार सगराने केला
तालजंघाचा जेष्ठ पुत्र वीतिहोत्र
वीतिहोत्राचा पुत्र मधू
मधूचा जेष्ठ पुत्र वृष्णी
याच मधू वृष्णी व यदू यांच्यामुऴे हा वंश #माधव_वार्ष्णेय_यादव या नावाने प्रसिध्द झाला.द्वापार युगात भगवान गोपाल कृष्ण याच यदुवंशात जन्मले होते..

भागवत महापुराणात यांच्या पुढिल १०० पिढ्यांचे कुलवृत्तांत वर्णन आलेय .

भगवंतांनी जर सर्व क्षत्रियांना ठार केले असते तर मग हे जीवंत राहिले नसते त्यामुऴे भगवंतांनी "विनाशाय दुष्कृताम् "या न्यायाने दुष्टांचाच संहार केलाय सज्जनांचा संहार कधीच केला नाहि.
भगवंत अविचारी कधीच वागत नसतात हे भक्तांनी सदैव ध्यानात ठेवावे.)

क्षत्रिय वर्ण जर नष्ट झाला तर प्रजापालन कोण करेल ? न्यायदान, दंडदान कोण करेल? गो, ब्राह्मण, साधु, संत, सज्जन, स्त्रीया यांचे रक्षण कोण करेल? त्यामुऴे भगवान परशुरामांनी अंगी सामर्थ्य, बुध्दि, पराक्रम व योग्यता असताना देखील एकाहि राज्यावर आपली सत्ता स्थापन केली नाहि किंवा सज्जन क्षत्रियांना कधीच उपद्रव देखील दिला नाहि) भगवंतांची हि घोर प्रतिज्ञा ऐकुन रेणुका माता चिंतामग्न झाली.
कामधेनु चोरी प्रकरणावरुन १७ अक्षौहिणी सैन्यासह जर सहस्त्रार्जुनाचा संहार भगवंतानी केला आता इथे तर प्रत्यक्ष भगवंतांच्या पित्याची हत्या झाली आहे या नंतर भगवंतांचा आवेश कसा आवरणार ? कोण त्यांना महासंहारापासुन रोखु शकेल?
हा विचार जगन्माता पार्वती देवीचा अंश असलेल्या रेणुकामातेने केला .देवी रेणुकेच्या ठायी मातृवात्सल्य होते ते जसे भगवान परशुरामांविषयी होते तसेच सर्व प्राणीमात्रांच्या विषयी देखील होते.
दत्तमहाराज च आता हा प्रलयकारी संहार थांबवु शकतात किंवा भगवान परशुरामांना उपदेश करु शकतात हा विचार करुनच या दुख:द प्रसंगात रेणुका मातेने एक क्लुप्ती योजली .
हि काय योजना होती याबद्दल उद्या पाहु.
तुर्त लेखन मर्यादा.
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
Vengurlabhushan@gmail.com