विशेष सुचना - पुराणे हि थोतांड आहेत असे मानणार्या मंडऴींनी या लेखाकडे दुर्लक्ष करावे.
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन प्रजासत्ताक दिनाच्या आधी २ दिवस आपल्या देशाबद्दल पुराणांत काय वर्णने आली आहेत ती पाहुया.
#भारत हे नाव आपल्या देशाला का पडले? या विषयी प्रथम जाणुन घेवु.
स्वायंभुव मनूला प्रियव्रत नामक पुत्र होता त्याचा पुत्र नाभी व नाभीचा पुत्र वृषभ व या वृषभाचा पुत्र भरत होता हा महापराक्रमी व देवभक्त होता
ऋषभात् भरतो जज्ञे वीर: पुत्रशताग्रज:।
सोऽभिषिच्याय भरतं पुत्रं प्राव्राज्यमास्थित:।।
हिमाङ्गं दक्षिणं वर्षे भरताय न्यवेदयत् ।
तस्मात्तद् भारतं वर्षं तस्य नाम्ना विदुर्बुध:।। (वायु पुराण ३३.५१ व ५२)
ऋषभाला भरत नामक पुत्र झाला तो शंभरपुत्रात महापराक्रमी होता ऋषभाने त्याला राज्याभिषेक करुन स्वत:संन्यास घेतला.त्याने हैमवत नामक दक्षिणवर्ष राज्याकरता दिले तेच पुढे भारत वर्ष नामाने ओळखले जावु लागले.
भागवत पुराणात हि असेच वर्णन आलय (५.७.३)
दुसरा संदर्भ ऋग्वेदाच्या ऐतरेय ब्राह्मण व शु.यजुर्वेदाच्या शतपथ ब्राह्मणात आलाय त्यात भरताने चतुर्दिशांना दिग्विजय प्राप्त करुन शंभर पेक्षा अधीक अश्वमेध यज्ञ केले त्याने चारहि दिशांना आपले सार्वभौम राज्य स्थापले असे ऐतरेय ब्राह्मणात वर्णन आलय.(८.२३)
शतपथात अधीक विस्ताराने ७८ यज्ञ यमुनेच्या काठावर व ५५ गंगेच्या काठावर केल्याचा उल्लेख आहे (१३.५.४.११) हा भरत दुष्यंताचा पुत्र आहे त्यामुऴे भारत नाव पडले असे म्हटले जाते.
महाभारतात
भरताद् भारती:कीर्तियनेदं भारतं कुलम् ।
अमरे येच पूर्वेच भारता इति विश्रृता:।। (आदिपर्व ६९.४९)
भरतामुऴे भारताच्या प्रजेची कीर्ती झाली त्याच्या कुलास भारत कुल म्हणु लागले या नंतर त्याच्या राज्यास भारत नाव पडले.
अनेक मंडऴींच्या भुवया लगेच उंचावतात प्रश्न विचारतात कि यातल्या कोणत्या भरताच्या नावाने आपल्या देशास भरत नाव पडले? हे काय गौडबंगाल?
आपल्या देशात असे अनेक प्रजापालक भरत नावाचे राजे होवुन गेले त्यामुऴे हा भरत कि तो भरत हा प्रश्न गौण अाहे.
हे सर्व भरत दिग्विजयी महाराक्रमी व देवभक्त होते त्या सर्वांनीच पितृवात्सल्याने प्रजापालन केले त्यामुऴे ते सर्वच श्रेष्ठ होते त्यांचा आम्हास अभिमानच आहे.
एखाद्याच अलेक्झांडर किंवा नेपोलियन चे कौतुक करण्यापेक्षा हे अनेक पराक्रमी पुण्यश्लोक भरतांच्या देशात आम्हि जन्मलो याचा अभिमान आम्हास नक्किच हवा.
आपल्या देशांच्या सीमेच्या संदर्भात पुराणांत विस्तृत अध्यायात्मक वर्णने आली आहेत.ती मांडली तर लेखाचा विस्तार अधीक वाढेल म्हणुन देत नाहिये.
आयतो ह्याकुमारिक्यादागङप्रभा वाच्च वै ।(वायु पुराण)
कन्याकुमारी ते गंगेच्या उगमापर्यंत भारताची सीमा आहे.
पृथिव्यां भारतं वर्ष कर्मभूमिरुदाहृता ।
समस्त पृथ्वीवर भारत वर्ष हे कर्मभूमी मानले आहे असे ब्रह्मपुराण मानते. (ब्रह्मपुराण)
भारतभूमीचे वर्णन करताना मार्कंडेय पुराणात
देवानामपिविप्रर्षे सदा ह्येष मनोरथ:।
अपि मानुष्यमाप्स्यामो देवत्वात प्रच्युता: क्षितौ।
मनुष्य: कुरुते तत्तु यन्न शक्यं सुरासुरै:। (अ.५७.६३)
हे विप्रर्षे देवतांचा मनोरथ असतो कि देवपदापासुन जर आपण च्युत झालो तर भारतभूमीवर मनुष्यजन्मास यावे व देव व असुरांना दुर्लभ असे कार्य करावे.
अशा पुण्य भूमीवर हजारो पुण्यात्म्यांनी अनेक अवतार घेतले राजर्षि, महर्षि, संत, भक्त,वैदिक, विद्वान, योध्दे देशभक्त ज्या भारतवर्षात जन्मले ज्यांनी या भारत देशाला परम वंदनीय बनवले ज्यांनी देशसेवा, गोसेवा भूमातेची सेवा, मातृ पितृगुरुंची सेवा केली अनेक आदर्श आपल्या समोर स्थापले आपल्या देशाचे नाव वृध्दिंगत केले. त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होवुन लेखन विराम घेतो.
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले