##दानाची_आवश्यकता

सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन दान संकल्पना थोडि विस्ताराने सांगणार आहे.हिंदुत्वनिष्ठ भागवताचार्य डॉ.सच्चिदानंद शेवडे गुरुजींनी केलेल्या आज्ञेस अनुसरुन हा लेख देत आहे.
लेखाची संकल्पना प्रथम सांगतो मग विषयास आरंभ करतो म्हणजे हा लेख वाचताना मनात कोणताहि पूर्वग्रह राहणार नाहि .
सांप्रत हिंदुस्थानात गरीब व श्रीमंत हा भेद प्रकर्षाने दिसतो.सर्वच जातींमध्ये व वर्णांमध्ये गरीब आहेत तसच श्रीमंत किंवा सुखवस्तु मंडऴी देखील आहेत.
हल्ली समाजाला नेहमी दुसर्याकडुन अपेक्षा करण्याची वाईट सवय लागलीय .प्रत्येक ठिकाणी सरकार करेल. अमका करेल तमका करेल हि अपेक्षा ठेवल्याने एक मोठा वर्ग हा मार्गभ्रमीत होतोय .
याचा गैरवापर करुन मुलींना वाममार्गाला लावणे .शिक्षण व आरोग्य सुविधांचे आमिष देवुन धर्मांतर करणे हे प्रकार घडताहेत काहि प्रसंगात तर देशद्रोह हि घडतोय.
हे घडु नये या करता समाजाने आपले स्व कर्तव्य जाणुन काहि दान धर्म करावा या करता हे आवाहन आहे.
दान का करावे? मी कमवलेले द्रव्य मी का दुसर्याला द्यावे? हा प्रश्न एखाद्याच्या मनात सहज उत्पन्न होतो त्याचे उत्तर प्रथम पाहु मग दान संकल्पना पाहु.
सनातन वैदिक धर्मात मनुस्मृतित "प्रवृत्ति व निवृत्ति धर्म "असे दोन प्रकार वर्णन केले आहेत. भागवत महापुराणात देखील
प्रवृत्तं च निवृत्तंच द्विविधं कर्म वैदिकम् ।
आवर्तेत प्रवृत्तेन निवृत्तेनाश्नुतेऽमृतम् ।। (7-15-47)
प्रवृत्ति व निवृत्ति या दोन लक्षणांचा उल्लेख आहे.
आहार, निद्रा, भय व मैथुन या चार गोष्टि मानव व प्राण्यांमध्ये समान असतात. पण निवृत्ति धर्म हा मानवाला लाभलेली देणगी आहे.उदा.देतो.
भुक लागल्यावर भोजन करणे हि प्रकृती आहे मी माझ्या वाट्याचे अन्न ग्रहण केले व दुसर्याचे हि अन्न लुबाडले हि विकृती आहे.
वेऴप्रसंगी मी चार घास कमी खावुन ते दुसर्या गरजवंताला देणे हि संस्कृती आहे. भुक लागणे हि यातला प्रवृत्ति धर्म आहे व माझ्यातले चार घास अन्य गरजवंतास देणे हि निवृत्ति धर्म आहे.
दान हा निवृत्ती धर्म जाणावा.

आता दान संकल्पनेला काय गोष्टि आवश्यक असतात ते पाहु.
दाता प्रतिगृहीता च श्रध्दा देयं च धर्मयुक् ।
देशकालौ च दानानाणङ्गान्येतानि षड् विदु:।।
दाता, दान घेणारा, श्रध्दा, धर्मयुक्त देयवस्तू, देश व काल हि सहा अंगानी युक्त दा म्हणजे देणे या वरुन दान हा शब्द निर्माण झाला आहे.
1-दान देणारा दाता
2-दान घेणारा गरजवंत व सत्पात्री याचक (हा शब्द महत्वाचा आहे.दारु पिण्याकरता मद्यप्याला द्रव्य दिल्याने दानाचे पुण्य लाभणार नाहि उलट पापच लागेल. दान घेण्याकरता करता योग्य गरजवंत पाहणे गरजेचे आहे)
3- श्रध्दा - दान देणार्याची व घेणार्याची श्रध्दा त्यावर असणे गरजेचे आहे (ती नसेल तर दान निष्फळ ठरते कसे तेहि सांगतो.)
4-देय वस्तु - जी वस्तु किंवा गोष्ट आपण दुसर्याला देणार ती चांगलीच असली पाहिजे.नको झालेली किंवा खराब वस्तु देणे हे दानात येत नाहि. (खेऴण मोडल म्हणुन गरीबाला देणे हे दानात येत नाहि.शर्ट फाटला म्हणुन भिकार्याला दिला तो दानात येत नाहि.)
5 देश - योग्य प्रांतात योग्य वस्तु दान दिली पाहिजे (काश्मिर मधे राजस्थान प्रमाणे सुती सैल कपडे देणे हे अयोग्य ठरेल.तसच राजस्थानतल्या माणसाला काश्मिर प्रमाणे गरम कपडे देणे हेहि अयोग्य आहे.या करता देश व प्रांतास अनुसरुन दान द्यावे)
6 - काल - योग्य काऴी योग्य वस्तु दान देणे हे संयुक्त असते. उदा.हिवाळ्यात गरीबाला छत्री दान दिली तर ते व्यर्थ दान ठरेल ती पावसाऴ्यात देणे गरजेचे आहे .कांबळे (ब्लँकेट) हे थंडित दान देणे संयुक्त ठरते कारण त्यावेऴी ते उपयुक्त ठरु शकते.पण ते जर उन्हाऴ्यात दिले तर व्यर्थ नाहि का?
या सहा गोष्टिंचा विचार करुन मगच दान द्यावे.

न्याय कोश नामक ग्रंथात भीमाचार्य दान शब्दाची व्याखा करताना विस्तृत पणे म्हणतात
मुल्यग्रहणं विना स्वस्वत्वध्वंस परस्वत्व जनक:त्याग:।
एखाद्या गोष्टिचे मुल्य न घेता तिच्या वरील आपली मालकी कमी करुन तिथे दुसर्याची मालकी निर्माण करणे म्हणजे दान.
दुसरा व्यक्ति हा सत्पात्री हवा दाता व दान घेणारा यांची श्रध्दा व धर्मयुक्त देयवस्तु, देश व काल म्हणजे योग्य काऴी व योग्य ठिकाणी एखादि गोष्ट योग्य व्यक्तीस सुपुर्द करणे म्हणजे दान होते.

शांडिल्योपनिषदात म्हटलय
दानं नाम न्यायार्जितस्य धन धान्यादे:श्रध्दया अर्थिभ्य:प्रदानम् ।
न्यायमार्गाने म्हणजे न लुबाडता, न चोरी करता, लाच वगैरे न खाता मिऴालेले धन धान्यादि वस्तु गरजवंत सत्पात्री व्यक्तिस देणे म्हणजे दान.

दान चंद्रिका नामक ग्रंथात तीऴ, गुऴ, सुवर्ण, रजत, गृह, गोदान कन्यादान इथपासुन सर्वस्व दाना पर्यंत विविध दाने व त्यांचा मुऴे होणारे लाभ दिले आहेत.
आयुर्वेद व ज्योतिषशास्त्र यांचा हि संगम अापल्या धर्मात पाहायला मिऴतो काहि दुर्धर अाजारांवर औषधे सुरु करण्याआधी कर्मविपाक अवलोकन करुन विशिष्ट नक्षत्रांवर काहि दाने करण्यास सांगीतली आहेत. तुलापुरुष दान म्हणजे आपण जो तुलाभार म्हणतो तो. तो देखील यात मोडतो.तुला दान केल्यावर त्या द्रव्याचे (गुऴ, साखर वगैरे) चार भाग करुन अेक भाग पुरोहितास दुसरा भाग आश्रीत बंधुवर्गास तृतीय भाग दीन म्हणजे गरीबास व चतुर्थ भाग अनाथांना द्यावा असे सांगीतले आहे.
नित्यं नैमित्तिकं काम्यं त्रिविधं दान मुच्यते ।
चतुर्थं विमलं प्रोक्तं सर्वदानोत्तमं मतम् ।। (कूर्म पुराण)
नित्य म्हणजे रोज करायचे दान यात विद्यादान व अन्नदान हे प्रधान आहे यात मनात फळाचा उद्देश किंवा हेतु असता नये
नैमित्तिक म्हणजे काहि विशेष निमित्ताने ग्रहण, संक्रात किंवा पर्वकाऴात, तीर्थक्षेत्रावर पाप नाशा करता देतो ते दान येते.
काम्य म्हणजे आरोग्य संतती संपत्ती मिऴावी या करता केले जाते ते दान
चौथे दान विमल हे फार पुणकारक आहे निष्काम बुध्दिने व धर्मयुक्त अंतकरणाने हे दिले जाते यात संकल्प फक्त भगवंत प्रिती व्हावी एवढाच असतो. आपल्याकडे रोज पंचमहायज्ञ करण्याची परंपरा आहे आजहि अनेक घरात रोजचा वैश्वदेव सुरु अाहे.त्यात देखील अन्नाची आहुती देवतांना मग काकबली (पशुपक्षी) गोग्रास (गायी गुरे) व व अतिथी करता अन्नभाग सांगीतला आहे. (कमीत कमी चार घास तरी) याच कारण उपाशी कोणी राहता नये हेच आहे.
अेक सुंदर सुभाषित आहे.
शतेषु जायते शूर: सहस्त्रेषु च पण्डित:।
वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवती वा न वा ।।
शंभरात एक जण शूर असतो, हजारात अेक पंडित म्हणजे विद्वान असतो.वक्ता दहाहजारात एखादा असतो पण दाता होतोच असे नाहि ( वा न वा यावरुनच कमतरता असणे याला वानवा असणे असा शब्द प्रयोग रुढ झाला)
अन्नदानात् परं नास्ति विद्यादानं ततोऽधिकम् ।
अन्नेन क्षणिका तृप्ता यावत् जीवंतु विद्यया ।।
अन्नदाना अेवढे परम दान कोणतेच नाहि पण विद्यादान हे त्या पेक्षा हि श्रेष्ठ आहे कारण अन्नाने काहि क्षणांची तृप्ति होते पण विद्याधन ज्याला प्राप्त होते तो आयुष्यभर तृप्त होतो.
या करता आपल्या सर्वांना एक विनंती अाहे दरवर्षी जो आर्थिक गरीब व शिक्षणाची आवड असलेल्या गरजवंत विद्यार्थ्यास वहि पुस्तक वगैरे घेवुन द्या.किंवा गणवेश विकत घेवुन द्या. किंवा बसचा पास काढुन द्या.
व हे देताना त्या मुलांना सांगा आज मी तुम्हाला मदत करतोय उद्या तुम्हि स्वत:च्या पायावर उभे राहिलात कि आणखी दोघांना तुम्हि मदत करा तरच समाजातली गरीब श्रीमंत दरी कमी होवु शकेल.
दान दिल्यानंतर दान घेणारा आळशी व ऐतखावु होणार नाहि हि दक्षता देखील घेणे गरजेचे आहे कारण नाहितर तो सदैव हात पसरत राहिल. यास्तव धर्मशास्त्रात गोदान भूदान अशी दाने सांगीतली आहेत.गायीवर अेक कुटुंब पोसु शकते पण गाय दान घेतल्यानंतर तीला रोज चारा पाणी देणे, शेणगोठा करणे दुध काढणे हि मेहनत आपसुक होते व तेव्हाच कुटुंबाचे पोषण होते. भू दान हि तसच आहे कारण शेती बागायती मेहनतीने केली तरच त्यातुन द्रव्य प्राप्त होते. ऋषिमुनींनी हाच विचार करुन हि दाने सुचवली आहेत.यामुऴे दान घेणारा मेहनती होतो व कष्टाने पुढे जातो व त्याचे परावलंबीत्व समाप्त होते तेव्हा आपणहि आपल्याला जे शक्य आहे ते गरजुंना द्यावे व ते स्वावलंबी कसे होतील हा विचार करावा
हा विषय व्यापक आहे अनेक उदारणे देण्यासारखी आहेत पण विस्तारभयाने देत नाहिये तुर्त लेखन मर्यादा

वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
Vengurlabhushan@gmail.com