DevDharm —


शिवलिंगाची उत्पत्ती


लिंगमहापुराणात उल्लेख केल्याप्रमाणे, भगवान ब्रह्मा आणि विष्णु या दोघांमध्ये श्रेष्ठत्वाच्या मुद्द्यावरून भांडण सुरू झाले. या दोघांमध्ये नेमके श्रेष्ठ कोण असा वाद वाढत गेला परंतु, त्याचा निकाल काही लागेना. हा वाद वाढत असताना अचानक त्या दोघांच्या मधोमध एक अत्यंत तेजस्वी अग्निस्तंभ प्रकट झाला. आपल्या दोघांमध्ये अचानक हा तिसरा अग्निस्तंभ कसा आला याचे उत्तर दोघांनाही सापडेना. शिवाय, तो अग्निस्तंभ अतिशय विशाल होता. त्याची सुरुवात आणि शेवट कोठे आहे हेच त्या दोघांना कळत नव्हते. तेव्हा त्या दोघांनी या स्तंभाचा उगम कसा झाला हे शोधायचे ठरवले. ब्रह्मदेवाने स्तंभाच्या वरच्या भागाचा उगम शोधावा आणि विष्णुने खालच्या भागाचा असं ठरविण्यात आले. त्यानुसार दोघेही त्या अग्निस्तंभाचा आदि आणि अंत शोधण्यासाठी वेगाने निघाले. बराच काळ शोध घेतल्यावरही हे रहस्य काही उलगडेना, शेवटी अतिशय निराश होऊन ब्रह्मा आणि विष्णु आपल्या मूळ जागी परतले. त्यावेळी तिथे असलेल्या स्तंभातून 'ॐ...' असा ध्वनि त्यांच्या कानी पडला. ब्रह्मा आणि विष्णुने त्या स्तंभाला, त्यातील शक्तीला भक्तीभावाने नमस्कार केला आणि प्रार्थना केली. या आराधनेने प्रसन्न होऊन भगवान शिव तेथे अवतीर्ण झाले आणि दोघांनाही आशीर्वाद दिला आणि शिव निघून गेले. शिव उभ्या असलेल्या जागी पुन्हा तो तेजस्वी, विशाल स्तंभ प्रकट झाला. विष्णु आणि ब्रह्मदेवाच्या वादाच्यावेळी जो अग्निस्तंभ प्रगट झाला तो म्हणजेच शंकराचे पवित्र शिवलिंग आणि शिवलिंग ज्या दिवशी प्रगट झाले तो दिवस म्हणजेच शिवरात्रीचा पावन दिवस.
हे शिवलिंग सृष्टीतील पहिले शिवलिंग मानले जाते. ब्रह्मा आणि विष्णुने सर्वात पहिल्यांदा शिवलिंगाची पूजा केली. त्या दिवसापासून शिवलिंग पूजनाची परंपरा आजवर अविरतपणे सुरू आहे असे मानले जाते.


संकलन :- अशोककाका कुलकर्णी