DevDharm —


तीर्थक्षेत्रे व तीर्थयात्रा


हिंदू धर्मात आणि संस्कृतीत तीर्थक्षेत्रे व तीर्थयात्रा यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हे महत्त्व त्यांच्या तीर्थविवेचनात अनेक दृष्टिकोनांतून मांडलेले आहे. त्यांपैकी प्रमुख दृष्टिकोन पुढीलप्रमाणे आहेत :


तीर्थयात्रेचा अधिकारी
तीर्थयात्रेचा अधिकार देताना विशाल दृष्टिकोन स्वीकारलेला दिसतो. चारी आश्रमांतील लोक, ब्राह्मणादी उच्च वर्णीय लोक, स्त्रिया, शूद्र, संकरातून जन्मलेले, वर्णबाह्य, चांडाळ, म्लेंछ, रोगग्रस्त, पापी या सर्वांना हा अधिकार आहे. यज्ञ, तीन ऋणे, कुटुंबियांची उपजीविका इ. बाबतींतील कर्तव्ये पूर्ण केली नसतील तर हा अधिकार नाही, असेही मत आढळते. आईवडिलांच्या मृत्यूनंतर एक वर्षपर्यंत व पत्नी गरोदर असेल तर त्यावेळी यात्रेला जाऊ नये, असे म्हटलेले आहे.


यात्राविधी
तीर्थयात्रेला निघण्याची तयारी करताना विशिष्ट दिवशी एक वेळच भोजन घ्यावे. दुसऱ्या दिवशी मुंडन करून उपवास करावा. उपवासानंतर दुसऱ्या दिवशी नित्यकर्मे करून ‘मी अमुक अमुक तीर्थक्षेत्रांना जाणार आहे’ असा संकल्प करावा. नंतर गणेश, ग्रह व इष्ट देवतांची पाच अथवा सोळा उपचारांनी पूजा करावी. मग पार्वणश्राद्ध करावे. त्यानंतर कमीत कमी तीन ब्राह्मणांचा किंवा पुरोहितांचा सत्कार करून त्यांना काही धन द्यावे. मग यात्रेकरूचा वेष परिधान करून गावाला किंवा निदान स्वतःच्या घराला प्रदक्षिणा घालावी. तीर्थाच्या ठिकाणी स्नान करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. माणसाची पापे त्याच्या केसात रहात असल्यामुळे पुरुष व विधवांचे तीर्थक्षेत्री मुंडन केले जाते आणि सुवासिनींच्या दोन बटा कापल्या जातात. पितरांचे तर्पण, पिंडदान व श्राद्ध यांना तीर्थांत अत्यंत महत्त्व असते. त्यामुळे पितरांचा उद्धार होतो असे मानले जाते. तीर्थाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे पाप न करता इंद्रियनिग्रह करून रहावे, देवपूजा व देवदर्शन करावे इ. यात्राविधी सांगितला आहे.

तीर्थयात्रेचे फल

तीर्थयात्रेमुळे विविध यज्ञांइतके वा अधिक फल मिळते सर्व जन्मांतील पापे नष्ट होतात अनेक पिढ्यांचा उद्धार होतो इ. कल्पना आहेत. यात्रेमुळे पाप्यांचे पाप संपते व पुण्यवंतांचे पुण्य वाढते. पायी यात्रा करण्यामुळे अधिक पुण्य लाभते. संयमी, अहंकारहीन, अल्पसंतुष्ट, सत्यवचनी आणि व्रतनिष्ठ अशा व्यक्तीला समग्र पुण्यफल मिळते परंतु वाहनामुळे निम्मे, छत्र व पादुका यांमुळे निम्मे, व्यापाराने तीन चतुर्थांश आणि प्रतिग्रहामुळे सर्व पुण्य नष्ट होते. एखाद्याने आई, वडील, भाऊ, मित्र व गुरू यांना नजरेसमोर ठेवून तीर्थस्नान केले, तर त्या त्या व्यक्तीला एक बारांश पुण्य लाभते. धर्मशाळा, पाणपोई, अन्नछत्रे इ. मार्गांनी यात्रेकरूंची सोय करणाराला एक चतुर्थांश पुण्य लाभते.


संकलन :- अशोककाका कुलकर्णी