DevDharm —


*कऱ्हाडे ब्राह्मण*

कोयना आणि कृष्णा नद्यांच्या भागात जे ब्राह्मण वसले त्यांना प्रामुख्यानं कऱ्हाडे ब्राह्मण म्हटलं जाते .
कऱ्हाडे ब्राह्मण किंवा कऱ्हाडा ब्राह्मण ही मराठी ब्राह्मणांतील सात प्रमुख पोटजातींपैकी एक पोटजात आहे. महाराष्ट्रीय ब्राह्मण जातीतील इतर ६ पोटजाती देशस्थ ,चित्पावन , देवरुखे , दैवज्ञ , सारस्वत ब्राह्मण व गौड सारस्वत ह्या आहेत.
कऱ्हाडे हे प्रादेशिक नाव आहे व ते करहाटक प्रांत व त्यातील करहाटक या शहर यांवरून पडलेले आहे. तसेच दक्षिणी ब्राह्मणांतला तो एक पोटभेद आहे. कऱ्हाडे ब्राह्मण हे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, गोवा, आदि भागात सर्वत्र पसरलेले आहेत. कऱ्हाडातील ५४५ उपनामांपैकी २०२ उपनामे, गावांच्या नावांपुढे ‘कर’ असा प्रत्यय लावून बनवलेली आहेत. त्यांची एकूण २४ गोत्रे आहेत. सर्व कऱ्हाडे ब्राह्मण एकवेदी (ऋग्वेदी), एक सूत्री (आश्वलायन सूत्री) व एक शाखी (शाकल शाखी आहेत). बहुतेक कऱ्हाडे स्मार्त असून अद्वैत मतानुयायी आहेत. काही कऱ्हाडे वैष्णवही आहेत; पण ते त्या मानाने फारच थोडे आहेत. बहुतेक कऱ्हाड्यांची देवता कोल्हापूरची महालक्ष्मीच आहे. तथापि गोमन्तकातील कऱ्हाड्यांच्या कुलदेवता शांतादुर्गा, म्हाळसा,आर्या दुर्गा, महालक्ष्मी आदि आहेत. अनंत चतुर्दशीची पूजा, ललिता पंचमी, दुर्गाष्टमी व नवरात्रात सप्तशतीचे पाठ कऱ्हाडे ज्ञातीत विशेषत्वाने आढळतात.
महाराष्ट्रातील आजवर प्रसिद्ध झालेले निरनिराळ्या घराण्यांचे इतिहास पाहिले तर हे चटकन लक्षात येते की, करहाटक किंवा कऱ्हाड प्रांतातून ही ब्राह्मण घराणी प्रथम कोकणात गेली; व तेथूनच नंतर ती अन्यत्र गेली. असे दिसते की, दक्षिण कोकणची भूमी वसाहतीस योग्य झाल्यावर, शिलाहार राजे यांचे प्रोत्साहनमुळे, ती वसाहत करण्याकरिता निरनिराळ्या प्रदेशातून लोक आले व तेथे स्थाईक झाले. त्यापैकी कऱ्हाडे ज्ञाती ही एक होय.
उदाहरणार्थ, मावळंकर (सरदेसाई, लळीत, गोविळकर) घराण्यांचे मूळपुरुष नृसिंहभट्ट सत्यवादी हे मुळचे पैठणचे. ते इ.स. ११५० चे सुमारास, संगमेश्वर तालुक्यातील मावळंगे येथील जागृत नरसिंहाची उपासना करण्यासठी येथे आले व त्यांनी कडक तपश्चर्या केली. त्यायोगे त्यांना पुत्रलाभ झाला. त्यांचे नातवाला शिलाहार राजे विजयार्क यांचेकडून, इ.स. ११८५ चे सुमारास, संगमेश्वर गाव इनाम मिळाला.
इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात की, नृसिंहभट्ट यांचे कऱ्हाड घराणे हे कोकणातील पहिले व महत्त्वाचे होय; व करहाटक ब्राह्मणांचे राजापूर-संगमेश्वर टापूंत आगमन यांचेबरोबर झाले. तसेच, मराठवाड्यातील आंबेजोगाईतील खेर घराणे आले, ते कोंकणात नेवरे येथे स्थायिक झाले.
सातारा जिल्यातील पाटण तालुक्यातील ‘आटोलि’ गावाहून इ. स. च्या अकराव्या शतकाच्या सुमारास आठल्ये आले व ते कोंकणात देवळे महालाचे ‘धर्माधिकारी’ बनले. गुलबर्ग्याहून इ. स. १४२५ मध्ये पंडित (सरदेशपांडे, जेमिनीस, कुलकर्णी) हे देवळे, लांजे, हरचेरी, हातखंबा व पावस महालांच्या कुलकर्णी वतनाच्या सनदा घेऊन कोंकणात आले. ओरपे, सरपोतदार, कारखानीस, सबनीस आदी घराणी करहाटक प्रांतातून कोंकणात आली. गुजराथेतून गुर्जर आले व ते राजापूरला स्थायिक झाले.
कदंबराजांनी (कमलादेवी व माधव मंत्री यांनी) कित्येक ब्राह्मण घराणी गोमंतकात नेली; व तेथे त्यांना इनामे दिली. त्यामुळे ते गोमंतकातच स्थायिक झाले. पुढे मुसलमान व पोर्तुगीज यांच्या आक्रमणामुळे त्यापैकी काही घराणी निर्वासित झाली व रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात स्थायिक झाली. ठाकूर देसाई, प्रभूदेसाई, अधिकारी देसाई या घराण्यांची कुलदैवते गोमंतकातील आहेत; यावरून वरील विधानाला पुष्टीच मिळते. गोमंतकात अद्यापही कऱ्हाडे ब्राह्मणांची २०० कुटुंबे आहेत. म्हार्दोळ व शांतादुर्गा देवस्थानचे महाजन पाध्ये हे मुळचे पाध्ये होत. सध्या कऱ्हाडे हे सर्व भारतभर व बाहेरही पसरलेले आहेत. इतकेच नव्हे तर, काशी-रामेश्वर-नाशिक व नेपाळातील पशुपतेश्वर या देवस्थानातील क्षेत्रोपाध्याय कऱ्हाडेच आहेत. तथापि ते मुळात करहाटक प्रांतातून कोंकणात आले व कऱ्हाडे झाले हे खरे.
इतिहासकाळात बहुतेक कऱ्हाडे, हे खोत, इनामदार, सरदेसाई, देसाई, सरदेशपांडे, पोतदार, सरपोतदार, सरमुकादम, सबनीस, कारखानीस इत्यादि हुद्देदार होते. त्यामुळे त्या काळात त्या गावचे किंवा विभागाचे प्रमुखपद यांच्याकडे असे. सांप्रत कऱ्हाडे ब्राह्मण भारताच्या सर्व भागांत आढळतात व निरनिराळे व्यवसाय करतात. असामान्य बुद्धिमत्तेच्या व कर्तृत्वाच्या जोरावर कऱ्हाड्यांनी जीवनातील अनेक क्षेत्रे पादाक्रांत करून आपल्या पेशास विविधता आणली आहे. साहित्य, काव्य, राजकारण, नाटक, संगीत, इतिहास, शास्त्र, गणित शल्याचिकित्सा, चित्रकला, उद्योग, कारखानदारी वगैरे एकही क्षेत्र असे नाही की, जेथे कऱ्हाडा चमकला नाही. अद्वितीय रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई भारतातील राजकारणपटुत्व असलेली पहिली स्त्री ठरते. मुंबई प्रांतातील पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर स्वतंत्र भारताचे पहिले सभापती दादासाहेब मावळंकर , भारताचे पोलादी गृहमंत्री गोविंदवल्लभ पंत, आणि अनेकांनी भारतीय राजकारणात बहुमोल कार्य करून आपली नावे चिरस्मरणीय केली आहेत.

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*