DevDharm —


*राजापूरची गंगा*भगीरथानं स्वर्गलोकीची गंगा भूलोकी आणली, पण 'ही' गंगा पाताळातून पृथ्वीवर येते, असं जिच्याविषयी म्हटलं जातं ती म्हणजे राजापूरची गंगा. तिचं आगमन, वास्तव्य आणि निर्गमन याच्याविषयी कोणतेच आडाखे बांधता येत नाहीत. असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या या निसर्गाच्या आविष्कारामागचं विज्ञान अद्याप पूर्ण उलगडलेलं नाही.
एन एच १७ अर्थात मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला राजापूर नावाचं रम्य गाववजा शहर आहे. राजापूर वरून गोव्याकडे जाताना अर्जुना नदीवरचा पूल आणि नंतरचा एक छोटा घाट ओलांडल्यावर शहरापासून तीन - साडेतीन किलोमीटरवर उन्हाळे नावाचं गाव लागतं . साधारणत: तीन वर्षांनी हे गाव कायमच चर्चेत असतं. यावेळी एक वर्ष होण्याआधीच चर्चेत आलंय. त्याचं कारण म्हणजे इथे अवतीर्ण होणारी गंगा. गंगावतरण झाल्यावर महाराष्ट्र तसंच गोव्यातल्याही दूरदूरच्या ठिकाणांवरून भाविक इथं येतात. भारतीयांसाठी पवित्र असलेल्या उत्तरेतल्या गंगेप्रमाणेच दक्षिणेतली ही राजापूरची गंगाही पवित्र मानली जाते. तिच्या अकस्मात येण्या जाण्याच्या निसर्गाच्या चमत्काराचं सर्वांनाच अप्रूप.
जिऑलॉजिकल सर्व्हे विभागातील इंग्रजकालीन अधिकारी सी. जे. विल्किन्सन याने कोकणातील भूगर्भरचने बाबत अभ्यास केला होता. त्याच्या अभ्यासाआधारे प्रकाशित केलेल्या रत्नागिरीच्या गॅझेटमध्ये राजापूरच्या गंगेबाबत उल्लेख आढळतो. भूगर्भातील हालचालींमुळे सायफनप्रणालीने हे पाणी प्रवाहित होत असावे, असे त्यात म्हटले आहे. मेदिनी पुराणातही याचा उल्लेख आहे. स्थानिक दंतकथेनुसार, गंगाजी साळुंके नावाचा कुणबी दरवर्षी पंढरपूरला जायचा.
वयोमानानुसार त्याला जाणे जमेनासे झाले, त्यावेळी शेतात काम करतानाच तो रडू लागला. तेव्हा त्याची आयुष्यभरची सेवा पाहून शेतातल्या एका वटवृक्षाजवळ प्रत्यक्ष गंगा प्रकटली. या दंतकथेचा उल्लेखही गॅझेटियरमध्ये आहे.
गंगेचे झरे ३१५० चौरसयार्ड परिसरात आहेत. तेथे मुख्य काशिकुंडासह दगडाने बांधलेली एकूण १४ कुंडे आहेत. सर्व कुंडांतून पाणी वाहू लागले, की गंगा आली असे म्हणतात. गंगेच्या जवळच उन्हाळे येथे गरम पाण्याचे झरे आहेत. त्याठिकाणी स्नानकरून नंतर गंगास्नानाची परंपरा होती. तसेच गंगास्नानानंतर तीन - साडेतीन मैलावरच्या धूतपापेश्वराला गंगेच्या पाण्याने अभिषेक करण्याचाही प्रघात असल्याचे गावकरी सांगतात. या गंगेचे पाणी नेऊन आपल्या देवघरात पूजण्याचीही पद्धत आहे. गंगा येण्याच्या आणि टिकण्याच्या कालावधी बाबत नेमके आडाखे बांधता येत नाहीत. १८२१ पूर्वी ती दर वर्षी यायची . १८८३ मध्ये तिचे वास्तव्य ६८ दिवस होते. १९१८ नंतर तब्बल १८ वर्षे ती गायब झाली होती. १९४५ पासून १९९८ पर्यंत अंदाजे तीन वर्षांनी ती प्रकटते. ९ सप्टेंबर २००९ लागेल्यानंतर ती एक वर्ष पाच महिन्यांनीती अवतरली होती मागील वर्षी ती एप्रिल अखेरीस प्रगटली होती पण यंदा वर्ष होण्यापूर्वीच प्रकट झाली आहे . कविवर्यमोरोपंतइ. स. १७८९ मध्ये गंगास्नाना साठी आले होते. त्यावेळी त्यांनी २६ कडव्यांंचे 'गंगाप्रतिनिधीतीर्थ' नावाचे गीतीवृत्तातील काव्य लिहिले . डॉ. हेराल्ड एच. मान आणि एस. आर. परांजपे यांनी 'इंटरमिटंट स्प्रिंग्ज अॅट राजापूर इन द बॉम्बे प्रेसिडेन्सी' नावाचा प्रबंध तयार केला होता. हे दोन्ही उल्लेख 'राजापूरची गंगा' या पुस्तकात आहेत.
या देवस्थानची रजिस्टर्ड धर्मादाय ट्रस्ट आहे. संस्थान श्रीगंगामाई उन्हाळे असं त्या ट्रस्टचं नाव. या संस्थानचे ट्रस्टी श्रीकांत गोविंद घुगरे यांनी तेथील कार्यक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले, 'गंगेच्या आगमना नंतर ओटी भरून तिचं स्वागत केलं जातं. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी उदकशांत केली जाते. काही भाविक दान, लघुरुद आदी कार्यक्रम करतात. ३० किंवा ४५ दिवसांनी तिचा उत्सव साजरा होतो. त्या वेळी तिची महापूजा केली जाते. कीर्तनादी धार्मिक कार्यक्रम होतात.' ऐतिहासिक संदर्भां बाबत ते म्हणाले, की शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळात प्रतापरुद नावाच्या राजाने २१ ब्राह्मण घराण्यांची गंगा स्थानाच्या व्यवस्थे साठी नेमणूक केली. त्यांना गंगापुत्र असे म्हणतात. देवस्थानच्या ट्रस्ट मध्येही गंगापुत्रच आहेत. ही ट्रस्ट १९५२ मध्ये स्थापन झाली. इ. स. १३९४ च्या सुमारास गंगायेण्याची घटना सुरू झाली असावी, असा अंदाज आहे. मात्र तशा ठोस नोंदी आढळत नाहीत. शिवाजी महाराजांनी दोनदा गंगास्नान केल्याच्या नोंदी आहेत. १६६१ साली इंग्रजांची राजापूर येथील वखार लुटल्यावर शिवाजी महाराजांनी गंगास्नान केले होते. तसेच १६६४ मध्ये गागाभट्टांनी येथे घेतलेल्या ब्राह्मण सभेच्या वेळीही महाराज गंगास्नानाला आले होते. गंगा उन्हाळ्यात आली तर पाऊस त्या वर्षी पाऊस काहीसा पुढे जातो, असा अनुभव आहे. मात्र पावसाळ्यात आली, तर मात्र तसा काही परिणाम होत नाही. सध्या गंगेच्या मंदिर उभारणीचे काम प्रस्तावित आहे. त्यासाठी भाविकांच्या मदतीची निकड असल्याचेही घुगरे यांनी नमूद केले.
एका मता नुसार, भूगर्भात घडणाऱ्या सायफन सारख्या यंत्रणेमुळे ही घटना घडते. अर्जुना नदीच्या वरच्या म्हणजेच सह्यादीच्या बाजूला भूपृष्ठाखाली पोकळी आहे. ही पोकळी पाण्याने भरली, की ओव्हरफ्लो होऊन ते पाणी गंगातीर्थातून बाहेर पडते. या पोकळीतील पाणी पूर्ण संपेपर्यंत ते वाहत राहते. ही पोकळी दरवर्षी भरत नसल्याने गंगा येण्याचा कालावधी कमी जास्त होतो. भूमि अंतर्गत पाण्याच्या प्रवाहाचा हा परिणाम असल्याचा दुसरा एक मतप्रवाह आहे. काही ठराविक काळाने या प्रवाहातील पाणी बाहेर पडते. या प्रवाहाचं रहस्य भूपृष्ठाखालच्या भ्रंशाशी निगडित आहे, असं म्हणता येईल. कारण एखाद्या ठिकाणचे गरम पाण्याचे झरे हे भूपृष्ठाखाली प्रस्तरभंग असल्याचे पुरावे मानले जातात. राजापूरच्या गंगेच्या जवळच गरम पाण्याचे झरे असल्याने या गोष्टीला पुष्टी मिळते. गरम पाण्याचे झरे हे गंधक युक्त असतात. गंगेच्या ठिकाणी असलेल्या फक्त एक-दोन कुंडांमध्येच गंधकाचं काहीसं प्रमाण आढळतं, असंही डॉ. ठाकूरदेसाई यांनी नमूद केलं. कारण काहीही असलं, तरी यावेळी गंगा लवकर आल्यामुळे भाविक तिच्याकृपेने 'न्हाऊन' निघाले आहेत, असं म्हणायला हरकत नसावी.


*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*