DevDharm —


*शक्तिपीठे व देवीची इतर स्थाने*


देशाच्या सर्व भागांत देवीची पूजा होते. देवीची एकूण १०८ स्थाने सांगितली जातात. देवीची ५१ शक्तिपीठे ही कल्पना तर अत्यंत प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्रातील देवीची ‘औट’ म्हणजे साडेतीन स्थानेही विख्यात आहेत.
दक्षाच्या यज्ञात अपमानित झालेल्या सतीने प्राणत्याग केल्यावर शोकग्रस्त शंकर सतीचे शव खांद्यावर घेऊन नृत्य करीत त्रैलोक्यात हिंडू लागला. हे पाहून विष्णूने आपल्या चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे करून ते देशाच्या वेगवेगळ्या भागांतून टाकले. सतीच्या शरीराचे तुकडे आणि तिचे अलंकार ५१ ठिकाणी पडले. त्यांतील प्रत्येक ठिकाणी एक एक शक्ती आणि एक एक भैरव आहेत. त्या त्या स्थानाला शक्तिपीठ म्हटले जाऊ लागले.


*काही प्रमुख शक्तिपीठे पुढीलप्रमाणे*

कामाख्या–
आसाम राज्यात गौहातीजवळ नीलाचल पर्वतावर सतीची योनी गळून पडली. येथील मंदिरात कामाख्या देवीची मूर्ती नसून एका दगडावर योनीची आकृती खोदलेली आहे.

कामाक्षी–
दक्षिण भारतात शिवकांची येथे सतीच्या अस्थींचा सांगाडा गळून पडला. येथील कामाक्षीचे मंदिर प्रसिद्ध आहे.

कन्याकुमारी–
सतीच्या देहाचा पृष्ठभाग येथे गळून पडला. भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या या स्थानी सागरांचा संगम आहे.

काली–
कलकत्त्यात सतीच्या उजव्या पायाची बोटे गळून पडली. येथील कालीघाटावर कालीचे प्रसिद्ध मंदिर आहे.

महालक्ष्मी–
करवीर म्हणजेच कोल्हापूर येथे सतीचे तीन नेत्र गळून पडले. सध्या हिला अंबाबाई म्हणतात. दक्षिण काशी व महाराष्ट्रातील औट पीठांपैकी अर्धे पीठ या रूपानेही हे क्षेत्र प्रसिद्ध आहे.

यांशिवाय काशी, वृंदावन, श्रीशैलम्, पंचवटी, प्रभास, उज्जयिनी, पुष्कर, मानस सरोवर, प्रयाग, जगन्नाथपुरी, अमरकंटक, पशुपतिनाथ आणि कुरुक्षेत्र ही प्रसिद्ध क्षेत्रे शक्तिपीठे म्हणूनही प्रसिद्ध आहेत.

महाराष्ट्रात मातापूरची रेणुका , तुळजापूरची भवानी , कोल्हापूरची महालक्ष्मी ही पूर्ण व सप्तशृंगीचे अर्धे पीठ मानले जाते .

काही ग्रंथात थोडी वेगळी पण माहिती आहे - महाराष्ट्रात मातापूरची (माहूर) रेणुका, तुळजापुरची भवानी, आंबेजोगाईची योगेश्वरी व कोल्हापूरची महालक्ष्मी (अर्धे पीठ) ही देवीची साडेतीन पीठे मानली जातात.

माहूर (जि. नांदेड) येथे परशुरामाची माता रेणुका ही जगदंबेशी एकरूप मानली जाते. येथे मातृतीर्थ असून ज्यांना गुजरातेतील मातृगयेला जाणे जमत नाही ते येथे मातृश्राद्ध करतात.

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथील भवानी ही शिवाजी महाराजांची व रामदास स्वामींची कुलदेवता होय.

आंबेजोगाई (जि. बीड) येथील योगेश्वरी ही अनेक घराण्यांची कुलदेवता आहे.*देवीची इतर काही स्थाने*
मदुरा हे दक्षिणेतील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र. येथे मीनाक्षीचे भव्य मंदिर आहे. येथे शंकराने मीनाक्षीचे पाणिग्रहण केले होते.

म्हैसूर येथील चामुंडादेवीचे म्हणजेच महिषासुरमर्दिनीचे मंदिर प्रसिद्ध आहे.

गोव्यातील शांतादुर्गा आणि सौंदत्ती (धारवाड) येथील रेणुका म्हणजेच यल्लम्मा यांची क्षेत्रेही प्रसिद्ध आहेत.*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*