फाल्गुन कृ.५ सोमवार
२५ मार्च,२०१९
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन भगवान श्री परशुरामांचे चरीत्र पुढे पाहु.काल आपण गाधी राजाच्या वंशाबद्दल व सत्यवती व ऋचीक विवाह संबधी माहिती घेतली आता पुढे.
ऋचीक महर्षींना पत्नी सत्यवतीने व त्यांच्या सासूने सुपुत्रप्राप्तीकरता प्रार्थना केली.महर्षी ऋचीकांनी त्या विनंतीचा स्विकार करुन यज्ञावर दोन वेगवेगऴ्या मंत्रांनी चरु श्रपण केला (शिजवला)त्यातला एक क्षात्रतेजाने युक्त व एक ब्राह्मतेजाने युक्त होता. ते मध्यान्ह स्नानाकरता निघुन गेले.
भारतीय संस्कृतीत पत्नीच्या इच्छेनंतरच संतती प्राप्तीकरता अनुष्ठान केले जात असे हेहि महत्वाचे आहे पूर्वी मुलींचा लहान वयात साधारण ८ ते ११ वर्षापर्यंत विवाह संस्कार होत असे या नंतर कन्या वयात येईपर्यंत म्हणजे १६ वर्षापर्यंत पुढिल पाच वर्षे दांपत्याने ब्रह्मचर्यपालन पूर्वक व्रताचरण करणे अनिवार्य होते (मंगऴागौर किंवा शिवामुठ, गोपद्म हि सर्व पंचवर्षात्मकच व्रते आहेत ती या करताच) पती ने अग्निउपासना व पत्नीने व्रताचरण या दोन्हि गोष्टि साध्य केल्यानंतरच सुप्रजा निर्माण होते.अनेक सत्पुरुषांची संत महात्म्यांची चरीत्रे अभ्यासली असता त्यांच्या मातापित्यांचे धर्माचरणच अवतारांचे कारण ठरलेले दिसते. टेंब्ये स्वामींच्या वडिलांनी बारा वर्षे गाणगापुरात गुरुचरीत्र अनुष्ठान केले व त्यांच्या मातेने १२ वर्षे तुळशीला प्रदक्षिणा सेवा केली तेव्हा प.प.वासुदेवानंद सरस्वती जन्मले.माता पित्याच्या शनिप्रदोष व्रताचरणामुऴे नरसिंह सरस्वती स्वामींचा अवतार झाला.अशी शेकडो उदारणे देता येतील.सांगण्याचा हेतु हाच आहे की कामवासनेचे फलीत म्हणुन झालेली संतती हि सर्वसामान्यच असते परंतु उपासनेने व सदाचरणाने झालेली संतती हि अात्मोध्दार, वंशोध्दार व समाजोध्दार करते.
पत्नीच्या इच्छेशिवाय संतती होणे हा वचनभंग आहे
"धर्मेच अर्थेच कामेच न अतिचरव्यात्वयेयम् " (धर्म अर्थ व काम या पुरुषार्थात अतिचार न करता पत्नीच्या सहाय्याने हे पूर्ण करेन) या वधुपित्याच्या मागणीचा "नातिचरामी" म्हणुन वराने स्विकार केलेला असतो त्यामुऴे "कौम बढाओ " पोर जन्मास घालण्या करताच विवाह असतो हे शास्त्रास मान्य नाहि.
तर सुप्रजा निर्माण करणे हेच दांपत्याचे परम कर्तव्य आहे.
ऋचीक ऋषि स्नानास गेले असता सत्यवतीच्या मातेला वाटले आपल्या जावयाने लेकीकरता श्रेष्ठ प्रतीचा चरु शिजवला असेल व आपल्याकरता कनिष्ठ दर्जाचा चरु शिजवला असेल त्यामुऴे तिने तिच्याकडुन तो चरु मागुन भक्षण केला व सत्यवतीने मातेचा चरु भक्षण केला.
ऋचीकांना हे जेव्हा कऴले तेव्हा ते सत्यवतीला म्हणतात "मोठा अनर्थ झाला " तुझा पुत्र क्षात्रगुणांनी युक्त होईल व तो दुष्टांना शासन करणारा क्रूर होईल व तुझा भाऊ हा क्षात्र कुऴात जन्मुन ब्रह्मवेत्ता होईल.
सत्यवतीने ऋचीकांची प्रार्थना करुन त्यांना प्रसन्न केले ते म्हणाले तुझा पुत्र नव्हे तर नातू तसा होईल.
पुढे सत्यवतीला पुत्र झाला ते जमदग्नी
हे एक श्रेष्ठ ज्ञानी व सप्तर्षींमधला एक ऋषी म्हणुन गणले गेले.
रेणु ऋषींच्या कन्या रेणुका होती जमदग्नींनी तिचे पाणिग्रहण केले.
उद्या आपण या पुढचे चरीत्र पाहु.
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
vengurlabhushanGmail.com