'आपले प्राचीन ‘संपन्न’ रसायन शास्त्र'
पाऱ्याचा शोध नेमका कोणी लावला..?
ह्या प्रश्नावर निश्चित असे उत्तर कोणीच देत नाही. पाश्चात्य जगाला तर अगदी सतराव्या शतकापर्यंत पाऱ्याची नीट ओळख नव्हती. इजिप्त मधल्या पिरामिड मधे इसवी सनाच्या १८०० वर्षां पूर्वी चा पारा ठेवलेला आढळला.
पारा विषारी असतो या बाबत सर्वांचेच एकमत आहे. म्हणूनच १४० पेक्षा जास्त देशांनी पाऱ्याचा समावेश असलेल्या भारतीय आयुर्वेदिक औषधींवर तीन वर्षांपूर्वी प्रतिबंध लावला होता, जो नंतर उठवल्या गेला.
मात्र गंमत म्हणजे हा विषारी समजला जाणारा पारा, इसवी सनाच्या दोन / अडीच हजार वर्षांच्या आधी, वेगवेगळ्या क्षेत्रात भारता द्वारे वापरला जात होता. इसवी सनाच्या पाचशे वर्षांपूर्वी पासून तर हा आयुर्वेदात वापरला जातोय. अगदी पोटात घेण्याच्या औषधांमधे..! आता, पाश्चात्य जग ज्या बद्दल तीनशे वर्षांपूर्वी पर्यंत पूर्णपणे अनभिज्ञ होतं, अश्या विषारी पाऱ्याचा उपयोग साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी पासून आपण औषध म्हणून करतोय, हेच मुळात आश्चर्य आहे. आणि अश्या प्रकारे पाऱ्याचा उपयोग करताना त्याची पूर्ण ‘प्रोसेसिंग’ करून तो वापरला जायचा हे महत्वाचं.
आपल्या संस्कृतीत ज्या प्रमाणे जन्मापासून मृत्यू पर्यंत मनुष्यावर सोळा संस्कार केले जातात, त्याप्रमाणे पाऱ्यावर अठरा प्रकारचे संस्कार करून मगच तो औषधाद्वारे सेवन करण्या योग्य होतो. हे १८ संस्कार आहेत –
१. स्वेदन २. मर्दन ३. मूर्च्छन ४. उत्थापन
५. पातन ६. रोधन ७. नियामन ८. संदीपन
९. गगनभक्षणमान १०. संचारण ११. गर्भदृती १२. बाह्यदृती
१३. जारण १४. ग्रास १५. सारण १६. संक्रामण
१७. वेध १८. शरीरयोग
वाग्भटाचार्यांनी लिहिलेल्या ‘रस रत्नसमुच्चय’ यां ग्रंथात पाऱ्याच्या औषधी उपयोगाबद्दल बरीच सविस्तर माहिती दिलेली आहे. हा ग्रंथ साधारणपणे इसवी सन १३०० च्या आसपास लिहिल्या गेलेला आहे. यातील माहिती ही संकलित आहे. अर्थात जे ज्ञान आधीपासूनच माहीत आहे, त्याला हे तेराव्या / चौदाव्या शतकातले वाग्भटाचार्य शब्दांकित करून, सविस्तर समजाऊन आपल्यापुढे ठेवताहेत. (हे वाग्भट वेगळे आणि ‘अष्टांग हृदय’ हा आयुर्वेदाचा परिपूर्ण ग्रंथ, पाचव्या शतकात लिहिणारे वाग्भट वेगळे).
या ग्रंथात वेगवेगळ्या प्रक्रियांच्या विधी सविस्तर दिलेल्या आहेत. अर्थात किमान दोन / अडीच हजार वर्षांपूर्वी पासून आपल्या भारतीयांना हे ‘रसायन शास्त्र’ फार चांगल्याने माहीत होतं आणि आपल्या पूर्वजांनी त्याचा अत्यंत पद्धतशीर पणे विकास केलेला होता.
‘रस रत्नसमुच्चयात’ दिलेल्या माहितीनुसार दोला यंत्र, पातना यंत्र, स्वेदनी यंत्र, अंधःपातन यंत्र, कच्छप यंत्र, जारणा यंत्र, विद्याधर (ऊर्ध्वपातन) यंत्र, सोमानल यंत्र, बालुका यंत्र, लवण यंत्र, हंसपाक यंत्र, भूधर यंत्र, कोष्टी यंत्र, वलभी यंत्र, तिर्यकपातन यंत्र, पालिका यंत्र, नाभी यंत्र, इष्टीका यंत्र,धूप यंत्र, स्वेदन (कंदुक) यंत्र, तत्पखल यंत्र.. अश्या अनेक यंत्रांचा उपयोग ‘रसशाळेत’ केला जायचा. या यंत्रांद्वारे पारद (पारा), गंधक इत्यादींवर रासायनिक प्रक्रिया करून औषधं तयार केली जायची.
नागार्जुनाने ‘रस रत्नाकर’ या ग्रंथात सिनाबार या खनिजापासून पारद (पारा) मिळविण्याच्या आसवन विधीचा विस्ताराने उल्लेख केला आहे. अशीच विधी ‘रस रत्नसमुच्चय’ आणि पुढे चरक / सुश्रुत यांच्या संहितेतही आढळते. यात आसवन प्रक्रियेसाठी ढेकी यंत्राचा उपयोग सांगितलेला आहे. गंमत म्हणजे ज्या आधुनिक पद्धतीने पारा प्राप्त केला जातो, ती विधी, ह्या ग्रंथात दिलेल्या विधीसारखीच, फक्त आधुनिक साधनांनी केलेली, आहे...!
हे फार महत्वाचं आहे. ख्रिस्तपूर्व पाचशे / सहाशे वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी अत्यंत व्यवस्थित, well defined, systematic अश्या अनेक रासायनिक प्रक्रिया वापरायला सुरुवात केली होती, ज्यांचं मानकीकरण (standardization) त्याच काळात झालेलं होतं.
आचार्य सर प्रफुलचंद्र रे (सन १८६१ ते १९४४) यांना आधुनिक काळातील आद्य रसायन शास्त्रज्ञ म्हटले जाते. यांनीच भारताची पहिली औषधं निर्माण करणारी कंपनी, ‘बंगाल केमिकल्स एंड फार्मेस्युटीकल्स’ स्थापन केली. इंग्रजांच्या वरिष्ठ वर्तुळातही यांना बराच सन्मान होता. ह्या प्रफुलचंद्र रे ह्यांनी एक सुरेख पुस्तक लिहिलंय – ‘हिंदू केमिस्ट्री’ नावाचं. या पुस्तकात त्यांनी ठामपणे हे मांडलंय की रसायनशास्त्राच्या निर्मितीत आपले हिंदू पूर्वज कितीतरी पुढे होते. या पुस्तकात त्यांनी वेदांमधे असलेला वेगवेगळ्या रसायनांचा उल्लेख, अणु / परमाणूंचं असलेलं विस्तृत विवेचन, चरक आणि सुश्रुत यांनी रसायनांवर केलेले विस्तृत प्रयोग या बद्दल विस्तारानं लिहिलं आहे. अगदी त्या काळात असलेल्या केस रंगवण्याच्या कलेपासून ते पाऱ्यावर केलेल्या वेगवेगळ्या प्रयोगांपर्यंतचे अनेक संदर्भ या पुस्तकात येतात. धातुशास्त्राबद्द्ल सुध्दा या पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे. १९०४ मधे लिहिलेल्या ह्या पुस्तकाने इंग्रज संशोधकांचा आयुर्वेद आणि आपल्या प्राचीन रसायन शास्त्राकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.
आपल्या वेदांमध्ये रसायन शास्त्रासंबंधी अनेक उल्लेख येतात. आयुर्वेदात अश्मन, मृत्तिका (माती), सिकता (वाळू), अयस (लोखंड किंवा कांसे), श्याम (तांबे), सीस (शिसे) यांच्या मदतीने केलेल्या प्रयोगांची उदाहरणं आहेत.
तैत्तिरीय संहितेचा भाष्यकार, ‘सायण’ याने श्याम चा अर्थ काळे लोखंड असा केला आहे. यजुर्वेदात एका मंत्रात अयस्ताप (Iron Smelter) चा उल्लेख आहे. लोखंडाच्या खनिजाला लाकूड / कोळश्याने तापवून कश्या प्रकारे लोखंड हा धातू तयार केला जातो याचे वर्णन यात केलेले आहे. अथर्ववेदात शिसे या धातूवर ‘दघत्यम सीसम..’ नावाचे पूर्ण सुक्त आहे. शिश्याचे बनवलेले छर्रे युद्धात वापरायचे असा अर्थ यातून ध्वनित होतो.
प्राचीन काळातील यज्ञशाळा ह्याच या देशातील मूळ रसायनशाळा होत्या. तैत्तिरीय संहितेत यज्ञशाळेत / रसायनशाळेत लागणाऱ्या उपकरणांची सूचीच दिलेली आहे –
इष्य - इंधन
बर्ही - फुंकणी किंवा स्ट्रॉ
वेदि / घिष्ण्य - अग्नी निर्माण करण्याच्या जागा, ज्यातून रासायनिक प्रक्रियांसाठी लागणाऱ्या भट्ट्या निर्माण झाल्या.
स्रुक - चमचे
चमस - प्याले / भांडी
ग्रावस - खल-बत्ता मधील बत्ता
द्रोणकलश - रसायने ठेवण्याचे लाकडी पात्र
आघवनीय - रसायनांचे मिश्रण करण्याचे पात्र
ही यादी बरीच लांबलचक आहे. पण याचा अर्थ स्पष्ट आहे. त्या वैदिक काळात, शास्त्रशुध्द रित्या तयार केलेल्या रसायनशाळा होत्या. तेथे कोणकोणत्या वस्तू / पात्र असाव्यात हे निश्चित होतं. आणि करण्यात येणाऱ्या प्रक्रिया सुध्दा निश्चित आणि ठरलेल्या होत्या.
शतपथ ब्राम्हण, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद इत्यादी ग्रंथात ठिकठिकाणी रसायनं आणि त्यांचे विविध क्षेत्रात होणारे उपयोग या संबंधी विवेचन आढळते.
या काळात जगाच्या इतर भागात, रसायनशास्त्रा संबंधी असे सुस्पष्ट, व्यवस्थित आणि प्रक्रीयेसहित केलेले विवेचन आढळते का..? उत्तर नकारार्थी आहे. इजिप्त मधे काही मोजके उल्लेख आढळतात आणि चीन मधे. चीन ने अनेक रसायनांवर त्या काळात काम केल्याचे दिसते. मात्र हे सोडलं तर जगात इतरत्र कोठेही रसायनशास्त्र इतक्या प्रगत अवस्थेत आढळत नाही.
अकराव्या शतकातील चक्रपाणी दत्त ने ‘चक्रदत्त’ नावाचा ग्रंथ लिहिलाय. जुन्या माहितीला शब्दबध्द करून तो सुसूत्रपणे आपल्यासमोर ठेवतो. यात त्याने ताम्ररसायन बनविण्याची विधी दिलेली आहे. पारा, तांबे आणि अभ्रकावर प्रक्रिया करून त्याला गंधकाचा पुट देऊन ताम्ररसायन कसे तयार करतात, हे त्याने समजाऊन सांगितले आहे. याच पद्धतीने ‘शिलाजतुरसायन’ चे विवरण आहे.
चक्रपाणी च्या दोनशे वर्षानंतर शारंगधराचार्य यांनी लिहिलेल्या ‘शारंगधर संहिते’ मधे अनेक रसायन प्रक्रियांबद्दल उल्लेख आहे. मात्र यात सुरुवातीलाच लिहिले आहे की जुन्या ऋषी-मुनींनी आपापल्या संहितांमध्ये जे श्लोक दिलेले आहेत, आणि अनेक चिकित्सकांनी ज्यापासून यश मिळवले आहे, अश्या श्लोकांचे हे संकलन आहे. या संहितेत आसव, काढे बनवताना रासायनिक प्रक्रिया अत्यंत विस्तृतपणे दिलेल्या आहेत.
या किंवा अश्या अनेक ग्रंथांमध्ये कणाद च्या अणु / परमाणु सिद्धांताचा उल्लेख केलेला आढळतो. कणाद ने सांगितले आहे की एका प्रकारचे दोन परमाणु संयुक्त होऊन ‘द्विणूक’ निर्माण होऊ शकते. द्विणूक म्हणजेच आजच्या शास्त्रज्ञांनी परिभाषित केलेला ‘बायनरी मॉलीक्युल’ वाटतो.
प्राचीन भारतात रासायनिक प्रक्रियांसंबंधी बरीच माहिती होती. याच लेखमालेत ‘अदृश्य शाईचे रहस्य’ या लेखात, पाण्यात भूर्जपत्र टाकल्यावर दिसू शकणाऱ्या शाईचे वर्णन केले होते. अश्या प्रकारची शाई तयार करताना अनेक प्रयोग, अनेक रासायनिक प्रक्रिया त्या काळात केल्या असतील. वातावरणातील आर्द्रता, प्राणवायु, अनेक आम्लीय / क्षारीय पदार्थांबरोबर धातूंचा संपर्क झाल्यावर होणाऱ्या प्रक्रिया... यातून धातूंच्या संरक्षणाचे उपाय.. या साऱ्या गोष्टी तेंव्हा माहीत होत्या. ‘याज्ञवल्क स्मृती’ मधे धातुंना शुध्द करण्याची प्रक्रिया दिली आहे. ‘रसार्णव’ मधे सांगितलं आहे की शिसे, लोखंड, तांबे, चांदी आणि सोने ह्या धातूंमध्ये स्वसंरक्षणाची प्रवृत्ती ह्याच क्रमात कमी होत जाते, जी आजच्या आधुनिक रसायनशास्त्रा प्रमाणे बरोबर आहे.
हे खरंय की आजच्या रसायनशास्त्राने अफाट प्रगती केलेली आहे. मात्र आजपासून दोन / अडीच हजार वर्षांपूर्वी रसायनशास्त्राचे मुलभूत सिद्धांत मांडत, अत्यंत व्यवस्थित, परिपूर्ण अशी डॉक्यूमेंटेड सिस्टम भारतामधे कार्यरत होती, ज्या द्वारे अनेक क्षेत्रात रासायनिक प्रक्रियांद्वारे कार्य होत होते. औषधी शास्त्र, खनिज शास्त्र, धातू शास्त्र या सारखी अनेक क्षेत्र होती, ज्यात रासायनिक प्रक्रिया आवश्यक होत्या. मात्र महत्वाचे म्हणजे ही सर्व रसायने, जैविक स्त्रोतांपासून प्राप्त केली जात होती. संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने ह्या प्रक्रिया चालत होत्या.
आणि हे सर्व करत असताना आपल्या पूर्वजांनी इतकी मोठी विरासत आपल्या साठी मागे ठेवली आहे, की त्यातील अनेक प्रक्रियांचा नीट अर्थ लावणंच आपल्याला शक्य झालेलं नाही. अर्थातच प्राचीन रसायन शास्त्राच्या अभ्यासाची आज नितांत निकड आणि गरज आहे...!!
What's app वरुन साभार