फाल्गुन कृ.१२ सोमवार
१एप्रिल २०१९

सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन भगवान श्री परशुरामांचे चरीत्र पुढे पाहु.
परवा आपण भगवान परशुरामांकडुन पितृआज्ञेनुसार झालेला रेणुका मातेचा वध व पुनरुज्जीवन वरदान प्रकरण पाहिले आज पुढे पाहु.
#पाप_का_घडते या वर आपण विचार केला असता अनेक कारणे समोर येतात.पूर्वजन्मीचे कर्म या जन्मातली कर्मे, लोभ अशी अनेक कारणे पापाचरणास प्रवृत्त करतात.
रेणुका माता तर तपस्वी होत्या मग हे पाप त्यांच्या ठायी का निर्माण झाले असावे? याचे कारण म्हणजे काहि क्षण रजोगुणाचे वाढलेले प्राबल्य हेच आहे.
धर्मशास्त्रात एकाचे पाप दुसर्यास कसे बाधक होते यावर विवेचन आलेय
अालापाद् गात्रसंस्पर्शात् सहभोजनात्।
आसनाच्छयनात् यानात् पापं सङक्रमते नृणाम् ।। (गरुड पुराण ११२)
पापी माणसाशी संभाषण, त्याचा स्पर्श, सहवास, त्याच्यासह भोजन, त्याच्याशी एकासन (एकासनावर बसणे), शयन, व त्यासोबत वाहनातुन जाणे या गोष्टिंमुऴे पाप संक्रमीत होते.
पाप वाईट बुध्दि विचार हे सर्व संक्रमीत होतात व त्याचे परिणाम आपण प्रत्यक्ष अनभवु शकतो.संतांच्या संगतीत राहिलेले चोर दरोडेखोर हे सन्मार्गास लागतात व दुर्जनांच्या संगत केल्याने सज्जन नष्ट होतात.रामायण महाभारत व संतचरीत्रांमध्ये या दोन्हि गोष्टिंची हजारो उदारणे आहेत.
पत्नीचे निमिषमात्र झालेले दुराचरण हे वरील गोष्टिंच्या द्वारे (भोजन, शयन, एकासन वगैरे) जमदग्नींकडे संक्रमीत होवु शकले असते व त्यांची तपश्चर्या देखील यात खर्च जावु शकली असती त्यामुऴे जमदग्नींना संताप अनावर झाला. पापाचे कारण नक्कि काय असते? कोणत्या गोष्टिमुऴे माणुस पापाचरण करु. लागतो? असा प्रश्न अर्जुनाने भगवान गोपालकृष्णाला विचारला होता त्यावेऴी भगवंतांनी फार सुंदर उत्तर दिले
काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव:।
महाशनो महापाप्मा विध्द्येनमिह वैरिणम् ।। (भगवद्गीता ३.३७)
रजोगुणापासुन निर्माण झालेले काम व क्रोध हेच माणसाला पापकर्माकरता प्रवृत्त करणारे शत्रु आहेत ते मोठे अधाशी व पापी आहेत.
रजोगुणाचे प्राबल्य हे पाप घडवु शकते .
ब्राह्मणांचे आचरण हे सत्वगुणी हवे या नियमास बाध आल्यामुऴे हा सर्व प्रसंग घडला होता.
जमदग्नींच्या चरीत्रात सहस्त्रार्जुनाने गोमातेची चोरी केली तेव्हा देखील संताप आला नव्हता किंवा त्यांनी सहस्त्रार्जुनास शाप दिला नव्हता.( आपल्या कुटुंबाच्या हातुन पापाचरण होवु नये हिच त्यांची अपेक्षा होती अन्य कोणी पापाचरण केले असले तर त्याबद्दल त्यांनी कोणासहि शाप दिला नव्हता त्यांच्यावर क्रोध केला नव्हता हेहि विचार करण्यासारखेच आहे) भगवान परशुरामांना दोन वर जमदग्नींनी दिलेच त्याच सोबत पितृवचन पाऴल्या मुऴे त्यांनी भगवान परशुरामांना चिरंजीव होण्याचा वर दिला.चिरंजीव हि एक संज्ञा आहे. आपणास सप्त चिरंजीव व मार्कंडेय हे आठवे या सर्वांबद्दल माहिती आहेच. चिरंजीव म्हणजे अमर नव्हेत हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.चिरंजीवांचे आयुर्मान हे काहि युगांपर्यंत किंवा काहि कल्पांपर्यंत असते नंतर त्यांना देह त्याग करावाच लागतो हेहि सत्यच आहे.
महाभारतात द्रोण पर्वात परशुराम हे मन्वंतरांच्या समाप्तीस आपला देह त्याग करतील असे वर्णन आले आहे. पितृवचन पालन हे पुत्राचे परम कर्तव्य असते.भगवान राम, परशुराम यांचे चरीत्र हे पितृआज्ञापालनाचे आदर्श आहेत. उपनयन संस्कारात पित्याने पुत्राच्या हृदयावर हात ठेवुन मम व्रते 。 हा मंत्र जप केल्यानंतर वडिलांच्या द्वारे आचरणात आणली जाणारी व्रते, कुलाचार,स्थिर चित्त वडिलांनी दिलेले वचन पालन करणे हे पुत्रास क्रमप्राप्त च आहे.जन्मानंतर वारसा हक्काने वडिलोपार्जित संपत्ती पुत्राकडे येते त्याच सोबत वडिलांच्या आज्ञापालनाची जबाबदारी हे कर्तव्य सोबत येतेच.हक्क असतो तेथे कर्तव्य असलेच पाहिजे व ते पूर्ण करणे हे पुत्र कर्तव्यच आहे.
भगवान श्री परशुरामांचे चरीत्र हे शास्त्रमर्यादेच्या चौकटितच आहे भगवंतांनी पितृवचन पाऴल्यामुऴेच ते चिरंजीव झाले.
तुर्त लेखन मर्यादा.

वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले
Vengurlabhushan@gmail.com